कार्तिकी यात्रा कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे 

नगरपालिका व पोलीस प्रशासनाने संयुक्त पथकांची नेमणूक करावी.

कार्तिकी यात्रा कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे 

कार्तिकी यात्रा कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे   

 -जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद

पंढरपूर, दि. 17 : - कार्तिकी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी सुमारे 8 ते 10 लाख भाविक येतात. यात्रा कालावधीत भाविकांना आवश्यक सुविधा देण्याबरोबरच स्वच्छताही महत्वाची आहे. संबंधित सर्व शासकीय यंत्रणांनी शहरात येणाऱ्या वारकरी व भाविकांना स्वच्छता पाहून समाधान वाटावे अशा प्रकारे स्वच्छतेला प्राधान्य देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले

कार्तिकी यात्रा नियोजनाबाबत व आपत्ती व्यवस्थापन आराखड्याबाबत शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आली होती. यावेळी प्रांताधिकारी गजानन गुरव, मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, अर्चना गायकवाड, राज्य उत्पादन शुल्कचे एस.आर. कुसळे,तहसिलदार सुशिल बेल्हेकर, मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव,कार्यकारी अभियंता अमित निमकर, महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता भिकाजी भोळे, तालुका आरोग्य डॉ. एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षिका डॉ. जयश्री ढवळे, तसेच संबधित विभागाचे विभागप्रमुख उपस्थित होते.

 यावेळी जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले, कार्तिकी यात्रा कालावधीत पंढरपूरात येणाऱ्या वारकरी भाविकांना प्रशासनाकडून तसेच मंदीर समितीकडून आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतात. यामध्ये दर्शन, पत्राशेड, नदीपात्र वाळवंट, 65 एकर तसेच आवश्यक ठिकाणी तात्पुरते शौचालय उभारण्यात येतात. या शौचालयाची वेळोवेळी स्वच्छता व मुबलक प्रमाणात पाण्याची उपलब्धता करण्यात यावी. तसेच मंदीर परिसर , दर्शन रांग, नदी पात्र, प्रदक्षिणा मार्गाच्या स्वच्छतेसाठी जादा स्वच्छता कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी. वाळवंटात असणारे दगड, कपडे, कचरा काढून घ्यावा. भाविकांना यात्रा कालावधीत स्वच्छ व मुबलक प्रमाणात पाण्याची उपलब्धता ठेवावी. नदी पात्रावरील सर्व घाटांची स्वच्छता करण्यात यावी. अन्न व औषध प्रशासन विभागाने तात्काळ प्रसादाची दुकाने व खाद्यपदार्थांची दुकाने, किराणा दुकाने यांची तपासणी करावी. भेसळ करणाऱ्या दोषींवर तात्काळ कार्यवाही करावी. दर्शन रांगेजवळ असणाऱ्या तात्पुरत्या विश्रांती कक्षामध्ये भाविकांना औषध उपचार केंद्र, स्वच्छ पिण्याचे पाणी, चहा, नाश्ता, शौचालय आदी सुविधांची उपलब्धता करावी. दर्शन रांगेतील भाविकांचे जलद दर्शन व्हावे यासाठी दर्शन रांगेत ज्या ठिकाणाहून घुसखोरी होण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेसह सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे. मंदीर परिसर व प्रदक्षिणा मार्गावरील अतिक्रमणे तात्काळ काढण्यासाठी नगरपालिका व पोलीस प्रशासनाने संयुक्त पथकांची नेमणूक करावी. अशा सूचनाही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिल्या. 

वारकरी भाविकांसाठी देण्यात आलेल्या उपलब्ध सुविधांची माहिती लाऊड स्पिकरव्दारे वेळोवेळी द्यावी. मंदीर समितीने भाविकांच्या सुरक्षेसाठी दर्शन रांग, स्काय वॉक, दर्शन मंडप, मंदीर येथील फायर, स्ट्रक्चर व इलेक्ट्रिक ऑडिट करुन घ्यावे. अग्नीशमन यंत्रणा सज्ज ठेवावी. महावितरने 65 एकर व वाळवंटात तात्पुरती वीज जोडणी देताना सुरक्षित पध्दतीने द्यावी. वारकरी, भाविकांना गॅस टाकी देताना पुर्णपणे चेक करुन द्यावी यासाठी संबधित गॅस कंपनीच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. पशुसंवर्धन विभागाने जनावरांच्या बाजार तसेच नाक्यावर तपासणी मोहिम राबवावी व औषधांची उपलब्धता ठेवावी असे निर्देशही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिले.     यावेळी आपत्ती व्यवस्थापन केंद्राचे संचालक राहिलेले निवृत्त कर्नल व्ही. एन. सुपनेकर यांनी कार्तिक वारी कालावधीमध्ये घटना प्रतिसाद प्रणाली (IRS) आणि त्याद्वारे गर्दी नियोजनाशी निगडीत आपत्ती व्यवस्थापन यामध्ये गर्दी, चेंगराचेंगरी, त्याचे प्रकार, त्याचे रूपांतर मोठ्या आपत्तीमध्ये कसे होते अशा प्रकारच्या आपत्तीचे व्यवस्थापन कसे करावे, याबाबत माहिती दिली. तत्पुर्वी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्राशेड, तात्पुरते विश्रांती कक्ष, महाव्दार घाट, कासार घाट, नदीपात्र, 65 एकर व मंदीर परिसराची पाहणी करुन संबधितांना आवश्यक सूचना दिल्या. तसेच कार्तिक यात्रा कालावधी वारकरी-भाविकांच्या आरोग्य सुविधेसाठी महाआरोग्य शिबीर 65 एकर येथे होणार असून त्या ठिकाणची पाहणीही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी केली