चैत्री एकादशी निमित्त श्री. विठ्ठल-रुक्मिणीची नित्यपूजा संपन्न
महाराष्ट्रासह अन्य राज्यातील भाविकही मोठ्या प्रमाणात पंढरपुरात दाखल

चैत्री एकादशी निमित्त श्री. विठ्ठल-रुक्मिणीची नित्यपूजा संपन्न
पंढरपूर (दि.08):- चैत्री शुद्ध कामदा एकादशी निमित्त मंदिर समितीच्या वतीने श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेची नित्यपूजा संपन्न झाली. श्री विठ्ठलाची नित्यपूजा मंदिर समितीचे सदस्य ह.भ.प. शिवाजीराव मोरे व श्री रुक्मिणी मातेची नित्यपूजा लेखाधिकारी मुकेश अनेचा यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न झाली. यावेळी मंदिर समितीच्या सदस्या शकुंतलाताई नडगिरे, ॲड माधवीताई निगडे, ह.भ.प.प्रकाश जवंजाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले व नित्य उपचार विभाग प्रमुख पांडुरंग बुरांडे उपस्थित होते.
मंदिरातील श्रींचा गाभारा, सोळखांबी व श्री संत नामदेव पायरी या ठिकाणी कामिनी, गुलाब, ड्रेसिंग सॉंग टेबल पाम, ऑर्किड, भगवा झेंडू, पिवळा झेंडू, वायसीस विटा, शेवंती, ब्ल्यू आणि पिंक डिजी, पांढरी शेवंती, अष्टर, चाफा व कमळ अशा विविध फुलांनी सजविण्यात आले आहे. विठ्ठल भक्त राजेंद्र पंढरीनाथ नाईक यांनी ही आरास केली आहे. या मनमोहक आरासामुळे मंदिर उजळून निघाला आहे.
महाराष्ट्रासह अन्य राज्यातील भाविकही मोठ्या प्रमाणात पंढरपुरात दाखल झाले आहेत. चैत्री एकादशीला भाविकांना सुलभ दर्शन व्हावे यासाठी मंदीर समितीच्या वतीने आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मंदिर समितीच्या वतीने दर्शनरांगेत व दर्शन मंडपात, स्वच्छ पिण्याचे पाणी, शौचालये, लाईव्ह दर्शन आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. दर्शनरांग दर्शनमंडप, मंदीर व मंदीर परिसर या ठिकाणची वेळोवेळी स्वच्छता करण्यात येत आहे. दर्शनासाठी येणा-या भाविकांसाठी मंदिर समितीच्या वतीने विमा काढण्यात आला आहे. या यात्रेला येणा-या भाविकांना पुरेसा व अत्याधुनिक सोईसुविधा देणे व उष्णतेच्या दहाकतेमुळे भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य ती दक्षता मंदिर समिती मार्फत घेण्यात आली असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले. दिवसेंदिवस उष्णतेची वाढणारी दहाकता लक्षात घेता, दर्शनरांगेत कुलर, थंड पिण्याचे पाणी, सरबत, मठ्ठा वाटप करण्यात येत आहे. याशिवाय, पत्राशेड व दर्शनमंडप येथे आरोग्य विभागाचा वैद्यकीय कक्ष, उपजिल्हा रूग्णालया मार्फत दर्शनमंडप येथे आयसीयू तसेच वैष्णव चॅरीटेबल ट्रस्ट, मुंबई यांच्याकडून मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध आहे. मंदिर परिसरात वैद्यकीय पथकासह दोन अद्यावत रूग्णवाहिका ठेवण्यात आल्या आहेत. तसेच गतवर्षीप्रमाणे पत्रा शेड येथे दशमी, एकादशी व द्वादशी दिवशी अन्नछत्र सुरू करण्यात आले असून, भाविकांना पूर्ण वेळ साबुदाणा / तांदळाची खिचडी वाटप करण्यात येत आहे. दर्शन रांगेतील एकही भाविक उपाशी राहू नये या दृष्टीने सारडा भवन येथे देखील खिचडी वाटप करण्यात येत आहे. तसेच श्री. संत ज्ञानेश्वर दर्शनमंडप येथे चौकशी कक्ष उभारण्यात आला आहे. त्यामध्ये मराठी, इंग्रजी, हिंदी, कन्नड व तेलगू भाषा अवगत असलेले कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून, भाविकांना ध्वनिक्षेपकाद्वारे वेळोवेळी सूचना देण्यात येत आहेत. चंद्रभागा वाळवंट येथे महिला भाविकांच्या सोईसाठी चेंजिंग रूम व दर्शनरांगेत हिरकणी कक्ष उभारण्यात आला आहे. पंढरीत दाखल झालेल्या भाविकांनी सध्या विठुरायाच्या दर्शनरांगेत मोठी गर्दी केली आहे. दर्शन रांगेत हजारो भाविक उभे आहेत, या वारकरी भाविकांना सोई सुविधा उपलब्ध करून देण्यास मंदिर प्रशासन सज्ज असल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.