पंढरपूर अर्बन बँकेच्या १७ जागांसाठी ३८ अर्ज दाखल

सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी सहकारी बँक

पंढरपूर अर्बन बँकेच्या १७ जागांसाठी ३८ अर्ज दाखल

पंढरपूर अर्बन बँकेच्या १७ जागांसाठी ३८ अर्ज दाखल

परिचारक गटाकडून आठ नवीन चेहर्‍यांना संधी

पंढरपूर- दि पंढरपूर अर्बन को.ऑप.बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मंगळवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी १७ जागेसाठी ३६ उमेदवारांनी एकूण ३८ अर्ज दाखल केले आहेत. सत्ताधारी पांडुरंग परिवारासह विरोधी समविचारी आघाडीने देखील सर्व अर्ज भरले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी सहकारी बँक असणार्‍या पंढरपूर अर्बन बँकेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे. कोरोनामुळे पाच वर्षाची मुदत संपल्यानंतरही अडीच वर्षाने निवडणूक प्रक्रीया जाहीर झाली आहे. दरम्यान अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी सत्ताधारी पांडुरंग परिवाराच्या अठरा उमेदवारांनी अठरा अर्ज दाखल केले. यामध्ये बँकेचे विद्यमान अध्यक्ष तथा माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह त्यांचे चुलत बंधू राजाराम परिचारक, रजनीश कवठेकर, हरिष ताठे, सतीश मुळे, पांडुरंग घंटी, शांताराम कुलकर्णी, अनिल अभंगराव, मनोज सुरवसे, ऋषिकेश उत्पात, विनायक हरिदास, अमित मांगले, अनंत कटप, गणेश शिंगण, व्यंकटेश कौलवार, गजेंद्र माने, माधुरी जोशी व डॉ.संगिता पाटील आदींचा समावेश आहे.

सत्ताधारी गटाने यंदा माजी नगरसेवक अनिल अभंगराव व ऋषिकेश उत्पात, व्यापारी व्यंकटेश कौलवार व गजेंद्र माने, भाजपाचे पदाधिकारी अनंत कटप, गणेश शिंगण, अमित मांगले व डॉ.संगिता पाटील या नवीन चेहर्‍यांना संधी दिली आहे. नवीन व जुन्यांचा मेळ राखत पांडुरंग परिवाराने उमेदवारीचे वाटप केले आहे. परिचारक गटाकडून अनेकांनी उमेदवाराची इच्छा व्यक्त केली होती. यामधूनच सामाजिक समतोल राखत निवडी करण्यात आल्या आहेत.

दरम्यान सत्ताधारी गटा विरोधात मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी विविध पक्ष व संघटनांना एकत्र करून पंढरपूर अर्बन बँक बचाव आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीच्या विरोधात माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले, महादेव भालेराव, दिनेश गिड्डे, श्रीकांत शिंदे, मंदार बडवे, महेश उत्पात, हरिदास शिरगिरे, अशोक बंदपट्टे, एकनाथ सुर्वे, हनुमंत बाबर, बजरंग थिटे, रमेश थिटे, राजकुमार जाधव, मधुकर चव्हाण, छाया खंडागळे, रत्नमाला पुणेकर व जनाबाई अवघडे यांनी अर्ज दाखल केले आहेत.

बुधवार २८ रोजी अर्जाची छाननी होणार असून यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.