जलयुक्त शिवार अभियानातील कामांची गती वाढवावी

जिल्ह्यात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियानाची प्रभावी

जलयुक्त शिवार अभियानातील कामांची गती वाढवावी

जलयुक्त शिवार अभियानातील कामांची गती वाढवावी

          - जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

जिल्ह्यात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियानाची प्रभावी अंमलबजावणी

या अभियानात 61 कामामधून 11.50 लाख घन मीटर गाळ काढण्यात आला, गाळ काढण्यात सोलापूर जिल्हा राज्यात प्रथम 

सोलापूर, दि. 12( जिमाका):- जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत प्राथमिक आराखड्यानुसार 93 कोटी 92 लाखाची 2 हजार 896 कामे प्रस्तावित करण्यात आली होती. त्यातील 1 हजार 940 कामांना मंजुरी देऊन त्यातून 865 कामे सुरू झाली. सुरू झालेल्या कामातून 577 कामे पूर्ण झाली आहेत. कामांची ही गती खूपच कमी असल्याने संबंधित सर्व शासकीय यंत्रणांनी जलयुक्तच्या कामांची गती वाढवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले.

         जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जलयुक्त शिवार अभियान 2.0 आढावा बैठकीत जिल्हाधिकारी शंभरकर बोलत होते. यावेळी जिल्हा जलसंधारण अधिकारी दयासागर क्षमा, उपजिल्हाधिकारी चारुशीला देशमुख, कृषी उपसंचालक राजकुमार मोरे, उपविभागीय जलसंधारण अधिकारी सर्वश्री डी.एस. कदम, आर.डी. क्षीरसागर, जे.के.बंकापुरे, एच. सी. समताळे संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

      जिल्हाधिकारी शंभरकर पुढे म्हणाले की, जलयुक्त शिवार अभियान 2.0 हे राज्य शासनाचा प्राधान्यशील उपक्रम आहे. त्यामुळे सर्व संबंधित विभागानी जलयुक्त मध्ये मंजूर करण्यात आलेली सर्व कामे सुरू करणे अनिवार्य आहे. कृषी, भूजल, जिल्हा परिषद, ग्रामीण पाणीपुरवठा या विभागांनी जलयुक्त अंतर्गत मंजूर असलेली कामे सुरू केलेली दिसून येत नाहीत, तरी या विभागपमुखांनी पुढील 15 दिवसात ही कामे सुरू करून विहित वेळेत पूर्ण करून घ्यावीत, असे निर्देश त्यांनी दिले. गाळमुक्त धरण व गाळ युक्त शिवार योजनेची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी. जिल्ह्यातील अकरा तालुक्यात 109 कामांना प्रशासकीय मान्यता दिलेली होती त्यातील 61 कामे पूर्ण झाली आहेत. तरी उर्वरित सर्व कामे तात्काळ सुरू करण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिले. सद्यस्थितीत गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अंतर्गत सुरू असलेल्या 61 कामांमधून 11.50 लाख घनमीटर इतका गाळ काढण्यात आलेला असून सुमारे पंधराशे एकर क्षेत्रामध्ये हा गाळ पसरविण्यात आलेला आहे. यामुळे 115 कोटी लिटर अतिरिक्त पाणीसाठा निर्माण झालेला आहे, ही बाब अत्यंत चांगली असल्याचे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले. त्याच पद्धतीने उर्वरित कामे यंत्रणांनी पूर्ण करून घ्यावेत असे आवाहन ही त्यांनी केले.

 जिल्हा जलसंधारण अधिकारी श्री. क्षमा यांनी गाळमुक्त धरण व गायुक्त शिवार योजनेत जिल्ह्याची सद्यस्थिती सांगितली. तसेच या योजनेमध्ये 25 अशासकीय संस्था सहभागी झाल्या असून अंदाजे 1500 शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. तर अन्य दोन संस्थांनी यात सहभागी होण्यासाठी प्रस्ताव दिले असून समितीच्या परवानगीने त्यांना सहभागी करून घेतले जाणार आहे. त्याप्रमाणेच जिल्ह्यात पूर्ण झालेल्या 61 कामामधून 11.50 लाख घन मीटर इतका गाळ काढण्यात आल्याची माहिती देऊन सोलापूर जिल्हा गाळ काढण्यामध्ये राज्यात प्रथम असल्याचे त्यांनी सांगितले.

   यावेळी जिल्हाधिकारी शंभरकर यांनी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक 2.0, जलशक्ती अभियान व अमृत सरोवर अभियान आदिचा सविस्तर आढावा घेऊन संबंधित यंत्रणांना मार्गदर्शक सूचना दिल्या.