आझादी का अमृत महोत्सव…

जात, धर्म, भाषा विसरून बलशाली देशासाठी प्रयत्न करूया- डॉ श्रीकांत येळेगावकर

आझादी का अमृत महोत्सव…

आझादी का अमृत महोत्सव

जात, धर्म, भाषा विसरून बलशाली देशासाठी प्रयत्न करूया- डॉ श्रीकांत येळेगावकर*

स्वातंत्र्य सैनिक, शहिदांच्या कुटुंबियांचा सन्मान

सोलापूर, दि.10(जिमाका): अनेक भाषा, जाती, धर्मांनी आपला देश एकसंध बनलेला आहे. देशात सर्वांना सामाजिक न्याय, स्वातंत्र्य मिळत आहे. देशात सुराज्य निर्माण करण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. जात, धर्म, भाषा सर्व विसरून आपण सर्वांनी बलशाली देश होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन इतिहासतज्ज्ञ प्रा.डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी केले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत. आज रंगभवन येथे आयोजित मराठी, हिंदी देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाप्रसंगी डॉ. येळेगावकर बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, तहसीलदार अंजली मरोड यांच्यासह महसूल अधिकारी उपस्थित होते.

डॉ. येळेगावकर यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सोलापूर जिल्ह्यातील महात्म्यांचे, स्वातंत्र्य सैनिकांचे असलेले योगदान विषद केले. देशाच्या प्रगतीसाठी समता, बंधुता, एकता हवी आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी शेकडो प्राणांची आहुती द्यावी लागली. त्यांच्या त्यागातून, बलिदानातून देशाला स्वातंत्र्य मिळाले. मल्लप्पा धनशेट्टी, किसन सारडा, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन या चार हुतात्म्यांचे बलिदान जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे. जिल्ह्यातील पहिला हुतात्मा शंकर शिवदारे हे आहेत, त्यांना शिंदीची झाडे तोडणाऱ्या मुलांना सोडा म्हटल्याने गोळ्या घालण्यात आल्या होत्या, असे डॉ. येळेगावकर यांनी सांगितले. 

सोलापूर जिल्ह्याने सर्व प्रथम 9 ते 12 मे 1930 साली साडेतीन दिवस स्वातंत्र्य उपभोगले होते. नगरपरिषदेवर पहिल्यांदा तिरंगा फडकविण्यात आला होता. या कालावधीत जिल्ह्यात एकही अधिकारी नव्हता, मास्को आकाशवाणीवर सोलापूरच्या स्वातंत्र्याची बातमी आल्याने 12 मे 1930 ते 30 जून 1930 असा 49 दिवसांचा मार्शल लॉ लावण्यात आला होता. या काळात नागरिकांचा अमानूष छळ केल्याची माहितीही डॉ. येळेगावकरांनी दिली.  

जिल्हा प्रशासनातर्फे स्वातंत्र्य सैनिक, शहिदांच्या कुटुंबियांचा सन्मान*

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत. आज रंगभवन येथे आयोजित कार्यक्रमात स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवान यांचे कुटुंबीय आणि वीरचक्र प्राप्त जवान यांचा सन्मान जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. त्यांच्या सन्मानासह तिरंगा ध्वजाचे वाटपही करण्यात आले. 

माहिती पुस्तिकेचे प्रकाशन*

देशाच्या रक्षणासाठी बलिदान दिलेले वीर जवान, स्वातंत्र्य लढ्यात सहभागी असलेले जिल्ह्यातील काही स्वातंत्र्यसैनिकांची माहिती जिल्हा माहिती कार्यालयाने संकलित केली आहे. याबाबत सोलापूर जिल्ह्यातील काही दीपस्तंभ म्हणून माहिती पुस्तिका तयार केली आहे. त्याचे प्रकाशन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, डॉ. श्रीकांत येळेगावकर, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांच्या हस्ते आज झाले.

देशभक्तीपर गीतांतून हुतात्म्यांना वंदन*

शिवरंजनी सोलापूर प्रस्तूत वंदे मातरम हा मराठी, हिंदी देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमातून स्वातंत्र्यसैनिक, शहीद जवानांना वंदन करण्यात आले. उन्मेश शहाणे दिग्दर्शित देशभक्तीपर गीतांच्या बहारदार कार्यक्रमाला श्रोत्यांनी भरभरून दाद दिली. 

पोलीस बँड पथकाने राष्ट्रगीत आणि देशभक्तीपर गीते सादर करून प्रेक्षकांची दाद मिळविली. स्वत: पोलीस अधीक्षक श्रीमती सातपुते यांनी देशभक्तीपर गीत गाऊन प्रेक्षकांची वाहवा मिळविली. तसेच तहसीलदार अंजली मरोड यांनीही हर करम अपना करेंगे हे देशभक्तीपर गीत गाऊन कार्यक्रमात रंगत आणली. 

निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती पवार यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची माहिती दिली. सूत्रसंचालन नायब तहसीलदार संदीप लटके यांनी केले. यावेळी समृद्धी अनिल कारंडे हिने मैं उस भारत से आती हूं… कविता सादर केली.