वारकरी भाविकांना केंद्रबिंदू मानून प्रशासनाने सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात

पालखी तळांची, मार्गाची पाहणी करत तातडीने त्रुटीची पूर्तता करण्याचे निर्देश 

वारकरी भाविकांना केंद्रबिंदू मानून प्रशासनाने सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात

वारकरी भाविकांना केंद्रबिंदू मानून प्रशासनाने सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात

- पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

पालखी तळांची, मार्गाची पाहणी करत तातडीने त्रुटीची पूर्तता करण्याचे निर्देश 

पंढरपूर, दि. ८ (उ. मा. का.) : वारकरी भाविकांना केंद्रबिंदू मानून प्रशासनाने सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, महिला वारकऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन स्वच्छता गृहे उपलब्ध करून द्यावीत, अशा सूचना महसूल, पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज केल्या.

आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासोबत येणाऱ्या वारकरी भाविकांसाठी पालखीतळ व मार्गावर प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सोयी - सुविधांची महसूल, पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज पाहणी केली. त्यावेळी त्यांनी पालखी मार्ग व तळवरील त्रुटीची पूर्तता तातडीने करावी, अशा सूचना संबंधितांना केल्या.

सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते, माळशिरस, वेळापूर, पिराची कुरोली, भंडीशेगाव, वाखरी पालखीतळ तसेच पुरंदावडे येथील रिंगण व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, आमदार सर्वश्री समाधान आवताडे, राम सातपुते आणि जयकुमार गोरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रमुख ॲड. विकास ढगे, विश्वस्त श्री. देसाई, सुधीर पिंपळे, प्र. जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी, अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, अतिरीक्त जिल्हा पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, प्रांताधिकारी नामदेव टिळेकर आणि गजानन गुरव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे, तहसीलदार सुशील बेल्हेकर, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते

यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासोबत मोठ्या संख्येने वारकरी भाविक येतात. सद्यस्थितीत उन्हाची तीव्रता लक्षात घेवून आपत्कालीन कक्षांची संख्या वाढवावी. पालखी मार्गावर ठिकठिकाणी वारकऱ्यांसाठी विसावा कक्ष उभारावेत. सदर कक्षांमध्ये वारकऱ्यांसाठी ओ. आर. एसची पाकिटे, स्वच्छ पिण्याचे पाणी, पंखे, मोबाईल टॉयलेट्स, इमर्जन्सी मेडिकल युनिट इत्यादी गोष्टींची व्यवस्था करण्यात यावी. त्याचबरोबर पालखी तळावर व मार्गावर वारकरी भाविकांना आरोग्यविषयक सेवा तात्काळ उपलब्ध होण्यासाठी सर्व सुविधायुक्त फिरत्या दवाखान्यांची तसेच मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करावी, अशा सूचना श्री. विखे पाटील यांनी दिल्या.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, नातेपुते येथील पालखी तळासाठी जागा अपुरी पडत असल्याने पालखी तळालगत असलेली जागा उपलब्ध करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी. महावितरण विभागाने पालखी तळ व मार्गावरील धोकादायक वीज वाहक तारा व खांब तसेच रोहित्र सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावेत. आवश्यकतेनुसार विद्युत व्यवस्थेसाठी मोबाईल जनरेटरची व्यवस्था करावी. वेळापूर पालखी तळावर प्रखर प्रकाशासाठी अधिकच्या हायमास्टची व्यवस्था करावी, असे त्यांनी यावेळी सूचित केले.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, पिराची कुरोली पालखी तळाची स्थानिक यंत्रणा कामाला लावून तात्काळ स्वच्छता करून घ्यावी. तसेच राष्ट्रीय महामार्गापासून पालखी तळापर्यंत येणाऱ्या रस्त्याच्या साईट पट्ट्या तात्काळ भरून घ्याव्यात. महिला वारकऱ्यांसाठी पालखी तळावर तंबुंची व्यवस्था करण्यात यावी. पालखी मार्गावर व पालखी तळावर पाण्याची मुबलक व्यवस्था व्हावी, यासाठी दूध संघाच्या टँकर्सची उपलब्धता करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी. पालखी सोहळा प्रमुखांनी सुचवलेली कामे प्राधान्याने करावीत, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. 

      यावेळी राज्य शासनाच्या वतीने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पालखी तळ व मार्गाची पाहणी करून पालखी सोहळ्यात वारकरी भाविकांना येणाऱ्या अडी-अडचणी जाणून घेऊन त्या तातडीने सोडविण्यासाठी संबंधितांना आवश्यक त्या सूचना केल्या, याबद्दल पालखी सोहळा प्रमुख व विश्वस्तांनी समाधान व्यक्त करून अभिनंदन केले.