पालखी तळ व मार्गावर भाविकांना आवश्यक सर्व सोयी सुविधा देण्यास प्राधान्य द्यावे

पालखी तळांची व मार्गाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

पालखी तळ व मार्गावर भाविकांना आवश्यक सर्व सोयी सुविधा देण्यास प्राधान्य द्यावे

पालखी तळ व मार्गावर भाविकांना आवश्यक सर्व सोयी सुविधा देण्यास प्राधान्य द्यावे

-जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद                                            

पालखी तळांची व मार्गाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

           पंढरपूर, दि. 30: - आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 17 जुलै 2024 रोजी होणार असून, या सोहळ्यासाठी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे 11 जुलै तर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे 12 जुलै 2024 रोजी सोलापूर जिल्ह्यात आगमन होणार आहे. या पालखी सोहळ्याबरोबर तसेच अन्य संताच्या पालखी सोहळ्यासोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात. या सर्व वारकरी भाविकांना पालखी मार्ग, विसावा तसेच पालखी तळांवर आवश्यक असलेल्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यास सर्व संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी प्राधान्य द्यावे. तसेच प्रशासकीय यंत्रणांनी परस्परात योग्य समन्वय ठेवून दिलेले जबाबदारी चोखपणे पार पाडावी, अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या.

           आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर पालखी तळांवर, मार्गावर वारकरी व भाविकांना कोणतही अडचण निर्माण होऊ नये तसेच भाविकांना पालखीतळावर प्रशासनाच्यावतीने अधिकच्या आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आज पालखी तळांची आणि पालखी मार्गाची पाहणी केली.यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर जिल्हाधिकारी मोनिकासिंग ठाकूर, प्रांताधिकारी सचिन इथापे, माळशिरसच्या प्रांताधिकारी विजया पांगारकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, तहसिलदार सचिन लंगुटे, सुरेश शेजुळ, गटविकास अधिकारी सुशील संसारे, सा.बां.कार्यकारी अभियंता अमित निंबकर, सुनिता पाटील, मुख्याधिकारी प्रशांत जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले,नायब तहसिलदार मनोज श्रोत्री यांच्यासह संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले, पालखी मार्गावरुन पालखी तळांकडे जाणाऱ्या रस्त्यांची वारीपूर्वी दुरूस्ती करावी. पालखी तळावर आवश्यक ठिकाणी मुरूमीकरण, स्वच्छता, मुबलक पाणी पुरवठा ,आरोग्य सुविधाबाबत नियोजन करावे. त्याचबरोबर आवश्यक ठिकाणच्या पालखी विसावा व तळाच्या कट्ट्यांची दुरुस्ती करावी. ज्या पालखी तळांवर सोहळ्यासाठी जागा अपुरी पडत असेल त्याठिकाणी आवश्यक जागेची उपलब्धता करण्याबाबत कार्यवाही करावी. पालखी मार्गावर व तळांवर उपलब्ध सोयी सुविधांचे सूचना फलक लावावेत. महावितरणने वाखरी पालखी तळावरील मधोमध असणाऱ्या विद्युत वाहक तारा व खांब एका बाजूला सुरक्षित स्थळी लावण्यात यावेत अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक देशपांडे म्हणाले, पालखी सोहळा कालावधीत भाविकांना पायी चालताना कोणत्याही अडचणी येऊ नये तसेच वाहतूक व्यवस्था सुरळीत रहावी त्याचबरोबर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या दृष्टीने पोलिस प्रशासनाचे काटेकोरपणे नियोजन करण्यात येणार आहे.जिल्हाधिकारी कुमार अशीर्वाद यांनी माळशिरस तालुक्यातील धर्मपुरी, नातेपुते, पुरंदावडे, माळशिरस, खडूस, वेळापूर, तोंडले, अकलूज ,माळीनगर, बोरगाव, माळखांबी, तसेच पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली, भंडीशेगाव, वाखरी या ठिकाणच्या पालखी तळांची , विसावाच्या ठिकाणची तसेच रिंगण सोहळ्याच्या ठिकाणची पाहणी करुन संबधितांना आवश्यक त्या सूचना दिल्या.