श्री.विठ्ठल रूक्मिणी मातेची प्रक्षाळपुजा संपन्न

आजपासून श्री.विठ्ठलास व श्री.रूक्मिणी मातेस पहाटे होणारी श्रीची काकडा आरती, नित्यपुजा

श्री.विठ्ठल रूक्मिणी मातेची प्रक्षाळपुजा संपन्न

 श्री.विठ्ठल रूक्मिणी मातेची प्रक्षाळपुजा.

पंढरपूर  दि.7 जुलै आषाढी एकादशी गुरूवार, दिनांक 29 जून, 2023 रोजी संपन्न झाली. या यात्रा कालावधीत अंदाजे 10 ते 12 लाख भाविक येतात. दरवर्षी यात्रेला भाविकांची गर्दी लक्षात घेता, चांगला महुर्त व दिवस पाहून श्रींचा पलंग काढून भाविकांना 24 तास दर्शन उपलब्ध करून देण्यात येते. त्यानुसार दि.20/06/2023 रोजी श्रींचा पलंग परंपरेनुसार काढण्यात आला होता व श्री विठ्ठलास लोड व श्री रूक्मिणीमातेस तक्या देण्यात आला होता. त्यामुळे काकडा आरती, पोशाख, धुपारती, शेजारती इत्यादी राजोपचार प्रक्षाळपुजेपर्यंत (दि.07/07/2023) बंद ठेवून भाविकांना जास्तीत जास्त वेळ दर्शन उपलब्ध करून देण्यात येत होते. 

 आज शुक्रवार, दि.07/07/2023 रोजी मुहूर्तानुसार श्री.विठ्ठलाची व श्री.रूक्मिणी मातेची प्रक्षाळपुजा संपन्न झाली. सदर पुजेच्या सुरवातीला मा कार्यकारी अधिकारी श्री राजेंद्र शेळके व व्यवस्थापक श्री बालाजी पुदलवाड यांच्या हस्ते श्रींस पहिले स्नान घालण्यात आले. 

  श्री.विठ्ठलाची व श्री.रूक्मिणी मातेची प्रक्षाळपुजा अनुक्रमे मा सदस्य श्री संभाजी शिंदे व श्री राजेंद्र शेळके, कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आली. तसेच देवाचा शिणवटा/थकवा घालविण्यासाठी आर्युवेदीक काढा श्रीस नैवेद्य म्हणून रात्री शेजारतीवेळी दाखविण्यात येणार आहे. त्यानुसार आजपासून श्री.विठ्ठलास व श्री.रूक्मिणी मातेस पहाटे होणारी श्रीची काकडा आरती, नित्यपुजा, महानैवेद्य, पोषाख, धुपारती व शेजारती इथेपर्यंतचे सर्व राजोपचार परंपरेनुसार सुरू करण्यात येत आहेत.

  तसेच या प्रक्षाळपुजेनिमित्त मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. या पूजेच्या वेळी मंदिरात पौराहित्य करणारे कर्मचारी, कार्यकारी अधिकारी श्री राजेंद्र शेळके, व्यवस्थापक श्री बालाजी पुदलवाड व विभाग प्रमुख श्री संजय कोकीळ उपस्थित होते.