लवकरच पत्रकारांच्या निवासाचा प्रश्न मार्गी लागेल : विनायक पात्रुडकर
पंढरपूर येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रधान
लवकरच पत्रकारांच्या निवासाचा प्रश्न मार्गी लागेल : विनायक पात्रुडकर
पत्रकारांच्या विविध समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार : किरण जोशी
पंढरपूर येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रधान
पंढरपूर, दि. 4 पत्रकारांना काम करताना मोठा दबाव असतो. मात्र ही स्पर्धा आहे ते टाळता येत नाही. राजकीय नेत्यांच्या मनामध्ये काय चालू आहे ते कोणालाच कळत नाही. मात्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे संवेदनशील मुख्यमंत्री असल्याने पत्रकारांच्या विविध समस्या आणि अडचणी सोडवण्यासाठी त्यांची कायम सकारात्मक भूमिका असते. पंढरपुरातील पत्रकारांच्या घरकुलाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पंढरपुरातील पत्रकारांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची मुंबई येथे भेट घेतल्यास पत्रकारांच्या घरकुलाचा प्रश्न मिटेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे माध्यम सल्लागार, जेष्ठ पत्रकार विनायक पात्रुडकर यांनी पंढरपूर येथील पत्रकारांना दिला. पंढरपूर येथील पत्रकार भवन येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर काम करताना आलेल्या अनुभवांचा प्रसंग सांगितला. पंढरपूर येथील पत्रकार भवन येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पदाधिकार्यांना नियुक्ती पत्र व पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व प्रथम विठ्ठलाच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख मान्यवर व पत्रकारांचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक करताना प्रदेश सहसचिव हरिभाऊ प्रक्षाळे यांनी पंढरपूर येथे पत्रकारांचे राज्य अधिवेशन व पत्रकारांच्या समस्या, अडीअडचणी तसेच पत्रकारांच्या निवास इत्यादी प्रश्ना संदर्भात प्रास्ताविकात मनोगत व्यक्त केले. ज्येष्ठ मार्गदर्शक, पत्रकार महेश खिस्ते, सुनील उंबरे, शिवाजी शिंदे, प्रशांत आराध्ये यांनी मनोगत व्यक्त करताना बरेच प्रश्न उपस्थित करत पत्रकारांच्या अडीअडचणी समस्या विषयी सांगितले.यावेळी मार्गदर्शन करताना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांनी पंढरपूर येथे राज्यातील पत्रकारांचे अधिवेशन घेण्याचा मानस व्यक्त करीत पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांसाठी पुण्यात उभारण्यात येणाऱ्या मीडिया टॉवर यासह राज्य संघटनेच्या विविध कामांची थोडक्यात माहिती दिली. यावेळी त्यांनी पंढरपुरात मोठ्या प्रमाणात व्हीआयपी येत असतात त्याप्रमाणे येथील पत्रकारही व्हीआयपी झाला पाहिजे. यासाठी नूतन कार्यकारणी काम करेल आणि पत्रकार भवन आणि घरकुलाचा प्रश्न मार्गी लागेल असा विश्वास देत नूतन कार्यकारणीला शुभेच्छा दिल्या.
यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पंढरपूर येथील नूतन कार्यकारणी अध्यक्ष वीरेंद्रसिंह उत्पात, सहअध्यक्ष दिनेश खंडेलवाल, कार्याध्यक्ष माऊली डांगे, सचिव अपराजित सर्वगोड, सहसचिव, विकास पवार, उपाध्यक्ष रविंद्र लव्हेकर,प्रसिद्धीप्रमुख सोहन जैस्वाल यासह सदस्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. या कार्यक्रमाला पत्रकार बांधवांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. शेवटी पंढरपूर शहराध्यक्ष वीरेंद्रसिंह उत्पात यांनी पत्रकार संघाचे संघटन वाढवण्याचे काम करणार असल्याचे सांगून उपस्थितांचे आभार व्यक्त केले.