पंढरपूर नगरपालिका निवडणुकीवर अनुसूचित जातीच्या मतदारांचा बहिष्कार 

चुकीच्या जनगणना व शासन निर्णयामुळे मागासवर्गीय इच्छुक मतदार उमेदवारी पासून वंचित

पंढरपूर नगरपालिका निवडणुकीवर अनुसूचित जातीच्या मतदारांचा बहिष्कार 

पंढरपूर नगरपालिका निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले निवेदन 

सन 2011 पूर्वी झालेल्या चुकीच्या जनगणना व शासन निर्णयामुळे मागासवर्गीय इच्छुक मतदार उमेदवार नगरपरिषद निवडणूक उमेदवारी पासून वंचित राहत असल्यामुळे पंढरपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानावर येथील अनुसूचित जाती समूहाच्या नागरिकांनी बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आला असून याबाबतचे पत्र महेश अशोक मोटे राहणार गोविंदपुरा पंढरपूर आणि हरिभाऊ आप्पा प्रक्षाळे राहणार अनिल नगर पंढरपूर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी महेश रोकडे यांना दिले आहे. 

यामुळे पार पडणाऱ्या निवडणूक प्रक्रियेवर संशय व्यक्त केला जात असून नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.

पंढरपूर नगरपालिका हद्दीत असलेल्या अनिल नगर, बौद्ध नगर, साठे नगर, ९७ ब, व्यास नारायण झोपडपट्टी, गोविंदपुरा या परिसरात मोठ्या प्रमाणावर अनुसूचित जाती समूहातील नागरिकांचे मोठे वास्तव्य आहे. मात्र २०११ पूर्वी झालेल्या चुकीच्या जनगणना आणि शासन निर्णयामुळे वरील परिसरात वास्तव्यास असणाऱ्या अनुसूचित जातीच्या इच्छुक उमेदवारांना निवडणुकीपासून वंचित राहावे लागत असल्याने सदर मतदारांनी २ डिसेंबर २०२५ रोजी होणाऱ्या पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुक मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे.

निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना देण्यात आलेल्या पत्रामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की 2011 पूर्वी झालेल्या जनगणने मध्ये सर्वे करताना जातीची कोणतीही पडताळणी केली गेली नाही. यामुळे पंढरपूर शहरातील नगरपरिषदेची निवडणूक २०२५ जाहीर झाली आहे. शहराची लोकसंख्या ९४,५५९ एवढी मतदारांची संख्या आहे. 

एकूण प्रभाग १८ आहेत त्यामध्ये प्रभाग क्र. ३ व प्रभाग क्र. ४ मध्ये मागासवर्गीय एस.सी. मतदारांची संख्या अठराशे एवढी आहे. परंतु प्रभाग क्र. ३ मधील मागासवर्गीय मतदाराची प्रभाग क्र. ४ मध्ये मत विभागणी करण्यात आली आहे. त्यामुळे एस.सी. मतदार संख्या कमी दाखवत आहे. या अगोदरही नगरपरिषदेच्या २५ वर्षाच्या पंचवार्षिक निवडणूक वेळी अनिल नगर, १९७ ब, बौध्द नगर, साठे नगर आणि व्यासनारायण झोपडपट्टी असा मिळून प्रभाग क्र. ३ हा एस.सी. महिला किंवा पुरुषासाठी राखीव ठेवण्यात येत होता तर प्रभाग क्र. ४ मध्ये कोळी समाज जास्त असल्याने त्या प्रभागातही स्त्री किंवा पुरुषासाठी एस.टी . राखीव आरक्षण देणेत येत होते. या अगोदरच्या झालेल्या नगर परिषद निवडणूकीत प्रभाग क्र. २ अनिल नगर हा आरक्षण राखीव होता परंतु सन २०२५ च्या पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणूकीत हा प्रभाग एस.सी. साठी आरक्षण राखीव महिला किंवा पुरुष साठी न ठेवल्याने या तिन्ही भागातील प्रभाग क्र. ३ मध्ये मागासवर्गीय मतदारांना राखीव आरक्षण न देण्यात आल्यामुळे मुख्याधिकारी नगरपरिषद पंढरपूर, प्रांत अधिकारी तथा प्रशासक नगरपरिषद पंढरपूर यांच्याबरोबर हरकती संदर्भात चर्चा झाली. त्यावेळी मुख्याधिकारी यांनी आम्हास लेखी पत्रान्वये तुमच्या मुद्यावर शासनाकडे तसे लेखी देवून शासनाच्या निदर्शनास आणुन देणेसाठी त्यांचेकडे पत्रव्यवहार केला जाईल असे आश्वासन दिले आहे. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे सध्याच्या पंढरपूर नगरपरिषदेच्या होणाऱ्या निवडणूकीत आमच्या हक्कावर निवडणूक आयोग जिल्हाधिकारी, तसेच नगरपरिषद मुख्याधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी यांनी चुकीच्या शासन निर्णयामुळे मागासवर्गीय मतदारांवर नगरपरिषद निवडणूक लढविण्यापासून वंचीत ठेवले गेल्यामुळे आम्ही सर्वजण नगरपरिषद सार्वत्रीक निवडणूक २०२५ मध्ये होणाऱ्या दिनांक २ डिसेंबर २०२५ रोजीच्या मतदानांवर बहिष्कार घालणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याबाबतचे पत्र जिल्हाधिकारी भा.प्र.सो. सोलापूर यांना तसेच उपजिल्हाधिकारी तथा नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी आणि नगरपरिषद मुख्याधिकारी पंढरपूर यांना वरील प्रमाणे मतदानांवर बहिष्काराचे लेखीपत्र निवडणूक आयोग अधिकारी, मुंबई, विभागीय आयुक्त साहेब, पुणे, जिल्हाधिकारी, सोलापूर, प्रांत अधिकारी कार्यालय पंढरपूर, उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी, नगरपरिषद पंढरपूर यांना देण्यात आले आहे.