परिषदांच्या माध्यमातून विचारांचे अदान प्रदान होते -डी. के. साखरे
क्रांतिजोती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दिप प्रज्वलनाने परिषदेची सुरवात
परिषदांच्या माध्यमातून विचारांचे अदान प्रदान होते -डी. के. साखरे
डोंगरगाव (ता. मंगळवेढा )सभा, संम्मेलने व परिषदांच्या माध्यमातून विचारांचे अदान प्रदान होते असे प्रतिपादन डोंगरगाव शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डी. के. साखरे यांनी केले.
आंतरराष्ट्रीय शिक्षक दिनाचे औचित्य साधून गुरुवार दिनांक 05.10.2023 रोजी केंद्रीय प्राथमिक शाळा डोंगरगाव येथे आयोजित केलेल्या शिक्षण परिषदेत साखरे बोलत होते तर परिषदेच्या अध्यक्षास्थानी जि. प. खोमनाळ शाळेचे मुख्याध्यापक मुक्तार पटेल होते. यावेळी मंगळवेढा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी पोपट लवटे विशेष अथिती म्हणून उपस्थित होते. पुढे बोलताना साखरे म्हणाले की, जगामध्ये दररोज घडणाऱ्या नवनवीन घडामोडी व शिक्षण क्षेत्रामध्ये बदलणारे संदर्भ यांची चर्चा अशा सभा सम्मेलनातून होते.
क्रांतिजोती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दिप प्रज्वलनाने परिषदेची सुरवात करण्यात आली. त्यानंतर जि. प. शाळा उन्हाळे वस्तीच्या शिक्षिका नौशाद शेख, शिवाजी नगर शाळेच्या शिक्षिका ज्योती कलूबरमे, डोंगरगाव शाळेच्या शिक्षिका अंबिका कर्वे व संगम विद्यालय डोंगरगाव चे सहशिक्षक तानाजीराव हजारे यांनी शिक्षण क्षेत्रात होत असलेल्या बदलाविषयी आपली मनोगते व्यक्त केली.
यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन करताना गटशिक्षणाधिकारी पोपट लवटे म्हणाले की, शिक्षण क्षेत्रात होत असलेले बदल आपण स्वीकारले पाहिजेत व शासनाने वेळोवेळी ठरवलेल्या धोरणांची अंमलबजावणी झाली पाहिजे तसेच शिक्षकांनी अध्यापन करताना संख्यात्मक निकालबरोबर गुणात्मक निकालाची सांगड घातली पाहिजे. यावेळी केंद्र प्रमुख प्रकाश साळूंखे, डोंगरगाव शाळेचे मुख्याध्यापक विश्वनाथ पाटील यांनीही शिक्षणाविषयी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कविता वाघमारे मॅडम यांनी केले तर अण्णासो मोहिते गुरुजी यांच्या आभारप्रदर्शनाने या परिषदेची सांगता झाली.