पंढरपूर उपविभागातील पोलीस पाटील पदाकरिता 295 उमेदवार उत्तीर्ण

पंढरपूर उपविभागातील मोहोळ व पंढरपूर या तालुक्यातील एकूण 69 गावातील पोलीस पाटील पदाकरिता भरती

पंढरपूर उपविभागातील पोलीस पाटील पदाकरिता 295 उमेदवार उत्तीर्ण

मुलाखत दि 8 ते 12 जानेवारी 2024 या कालावधीत

                                             - प्रांताधिकारी गजानन गुरव

पंढरपूर दि.31:- पंढरपूर उपविभागातील मोहोळ व पंढरपूर या तालुक्यातील एकूण 69 गावातील पोलीस पाटील पदाकरिता भरती प्रक्रिया सन 2023 रबविण्यात आली होती. त्यापैकी 53 गावातून पोलीस पाटील पदाकरिता एकूण 355 अर्ज प्राप्त झाले तर 348 उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र झाले होते. या परीक्षेमध्ये 295 उमेदवार उत्तीर्ण झाले असून पात्र उमेदवारांच्या मुलाखती दि. 8 ते 12 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये घेण्यात येणार असल्याची माहिती प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिली.  पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा रविवार दिनांक 31 डिसेंबर 2023 रोजी पंढरपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय या ठिकाणी परीक्षेसाठी 342 उमेदवार हजर होते व 6 उमेदवार गैरहजर होते. परीक्षा सकाळी 11 ते दुपारी 12.30 या वेळेत घेण्यात आली. परीक्षेची वेळ पूर्ण होताच 12 वाजून 40 मिनिटांनी उमेदवारांकरीता उत्तर सूची परीक्षा केंद्रावर प्रसिद्ध करण्यात आली. उत्तर सूचीमध्ये कोणाला काही आक्षेप असल्यास त्याबाबत दुपारी 03.00 वाजेपर्यंत हरकती नोंदवण्यासाठी वेळ देण्यात आली होती. या वेळेमध्ये कोणीही लेखी हरकत नोंदवलेले नाही. त्यामुळे सायंकाळी 5.30 वाजता लेखी परीक्षेमध्ये मिळालेले उमेदवार निहाय गुण प्रसिद्ध करण्यात आले. 80 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात आली होती. ही परीक्षा पास होण्यासाठी एकूण गुणाच्या 45 टक्के गुण मिळणे आवश्यक होते. परिक्षेत ज्या उमेदवारांना 36 किंवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त झाले असतील असे उमेदवार या परीक्षेमध्ये पास असल्याचे घोषित करण्यात आले. या परीक्षेमध्ये 295 उमेदवार पास व 47 उमेदवार नापास झाले आहेत.  

  यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर या ठिकाणी परीक्षा कालावधीत भेट देऊन आढावा घेतला व परीक्षेची व्यवस्था, नियोजन चोखपणे केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. या परीक्षेसाठी एकूण 20 समावेशक 5 पर्यवेक्षक 13 शिपाई 2 पोलीस कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आले होती . परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी तहसीलदार सुशील बेल्हेकर, तहसीलदार सचिन मुळीक यांनी कामकाज पाहिले या संपूर्ण प्रक्रियेचे अध्यक्ष व परीक्षा केंद्र प्रमुख म्हणून उपविभागीय अधिकारी गजानन गरव यांनी कामकाज पाहिले. पात्र उमेदवारांच्या मुलाखत दि 8 ते 12 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये घेण्यात येणार असून, त्याबाबत उमेदवारांना स्वतंत्ररित्या कळविण्यात येईल असे प्रांताधिकारी गुरव यांनी सांगितले.