पंढरीत आषाढी यात्रेसाठी जमला 14 लाख वैष्णवांचा मेळा

श्री संत ज्ञानेश्वर माऊली व श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखीचे पंढरीत आगमन

पंढरीत आषाढी यात्रेसाठी जमला 14 लाख वैष्णवांचा मेळा
पंढरीत आषाढी यात्रेसाठी जमला 14 लाख वैष्णवांचा मेळा

पंढरीत आषाढी यात्रेसाठी जमला 14 लाख वैष्णवांचा मेळा 

विठ्ठला दर्शनासाठी 14-16 तासांची पायपीट 

पंढरपूर,दि.16 ( हरिभाऊ प्रक्षाळे ) आळंदी व देहू येथून निघालेल्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा मंगळवारी रात्री उशिरा 10 वाजता पंढरीत दाखल झाला आहे. आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी इतर सर्व संतांच्या पालख्या, दिंड्या म़गळवारी सकाळपासूनच पंढरीत दाखल झालेल्या आहेत. कांहीं मानाच्या पालख्या, दिंड्या फक्त वाखरी येथील रिंगण सोहळा भक्तीमय वातावरणात साजरा करुन दाखल होतात. जून महिन्यात पाऊस चांगला झाल्याने आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी सुमारे 14 लाखांहून अधिक भाविक पंढरीत दाखल झाले असून उद्या ही संख्या वाढणार आहे.पंढरपूर शहरालगतचा परिसर, भक्ती सागर 65 एकर परिसर, सांगोला चौक, शेगांव दुमाला, भटुंबरे, इसबावी आदी भागात वारकरी भाविक मोठ्या संख्येने विसावले आहेत. सावळ्या विठ्ठल रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शनाची रांग गोपाळपूर पत्राशेडच्याही पुढे गेली आहे. पदस्पर्श दर्शनासाठी सुमारे 14 ते 16 तास वारकरी भाविकांना पायपीट करावी लागत आहे. महाराष्ट्र शासनाच्यावतीने पंढरीत सुलभ शौचालय इमारती मोठ्या प्रमाणात उभारले असून देखील नगरपरिषदने पुन्हा तात्पुरते फॅब्रिक्सचे शौचालय उभा केले आहेत. या शौचालयांना पाण्याची व्यवस्था अपुरी असल्याचेचित्र दिसून येत आहे. 

 विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर, स्टेशन रोड, नवी पेठ आदी भागात व्यापाऱ्यांनी आपली दुकाने थाटली आहेत. वारकरी भाविकांना लागणाऱ्या प्रासादिक वस्तू, तुळशी माळा, देवी देवतांचे फोटो, बच्चे कंपनीसाठीची खेळण्याची दुकाने भाविकांची वाट पाहत आहेत. आषाढी यात्रेसाठी आलेल्या भाविकांच्या, बच्चे कंपनीच्या करमणुकीसाठी सर्कस, मोठमोठे झोपाळे, पाळणे टिळक स्मारक येथे आलेले आहेत. पंढरीत आलेले भाविक भजन, कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून विठ्ठलाच्या नामस्मरणात तल्लीन झालेले आहेत.