चैत्री यात्रा कालावधीत अन्न औषध प्रशासनाने खाद्य पदार्थ तपासणी मोहीम राबवावी

यात्रेत भाविकांच्या आरोग्य सुरक्षेला व स्वच्छतेला प्राधान्य

चैत्री यात्रा कालावधीत अन्न औषध प्रशासनाने खाद्य पदार्थ तपासणी मोहीम राबवावी

चैत्री यात्रा कालावधीत अन्न औषध प्रशासनाने
खाद्य पदार्थ तपासणी मोहीम राबवावी
 प्रांत अधिकारी गजानन गुरव यांच्या सूचना

पंढरपूर, दि. 29 :-: चैत्र  शुध्द एकादशी 02 एप्रिल 2023 ला असून, यात्रेनिमित्त पंढरपूर शहरात श्री विठ्ठल- रुक्मिणी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात. चैत्री यात्रा उन्हाळ्याच्या दिवसात  असल्याने अन्न पदार्थ लवकर खराब होण्याची शक्यता आहे. भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अन्न व औषध प्रशासनाने हॉटेल, उपवासाचे पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी करण्यासाठी पथके नेमून मोहीम राबवावी अशा सूचना प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिल्या.
     चैत्री यात्रा नियोजनाबाबत शासकीय विश्रागृह, पंढरपूर येथे बैठक घेण्यात आली. बैठकीस तहसीलदार सुशील बेल्हेकर, अप्पर तहसीलदार समाधान घुटुकडे, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, मुख्याधिकारी अरविंद माळी, पोलीस निरीक्षक अरुण फुगे, मिलिंद पाटील, मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. प्रसन्न भातलवंडे,अन्न औषध प्रशासनचे श्री. कुचेकर, एस टी महामंडळाचे श्री .सुतार, न.पाचे नेताजी पवार, स्वच्छता विभागाचे शरद वाघमारे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
    यावेळी प्रांताधिकारी गुरव म्हणाले, पंढरपुरात चैत्री यात्रा कालावधीत तीन ते चार लाख भाविक येतात.  या यात्रेत भाविकांच्या आरोग्य सुरक्षेला व स्वच्छतेला प्राधान्य द्यावे. यात्रा कालावधीत पंढरपूर तसेच शहरालगत असणाऱ्या विविध मठामध्ये मोठ्या प्रमाणात भाविक वास्तव्यास असतात. अन्न औषध प्रशासनाने सर्व मठामध्ये बनविण्यात येणाऱ्या अन्न पदार्थाची  तपासणी  करावी व अन्न शिजवतना कोणती काळजी घ्यावी याबाबत आवश्यक सूचना द्याव्यात.तसेच दुकानातील भगर व इतर उपवासाच्या पदार्थांची तपासणी करावी.  यात्रा कालावधीत नगरपालिकेने स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा मुबलक पाणी पुरवठा करावा. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा. आरोग्य विभागाने तज्ञ डॉक्टरांसह वैद्यकीय पथकाची नेमणूक करावी. तसेच फिरते वैद्यकीय पथक, ऑक्सिजन, रक्तपुरवठा तसेच मुबलक औषधसाठा उपलब्ध राहील याबाबत नियोजन करावे. चैत्री यात्रा कालावधीत चंद्रभागा नदीमध्ये कावडी स्नानासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात. भाविकांच्या सुरक्षेसाठी नदीपात्रात यात्रिक बोटी सज्ज ठेवाव्यात.  यात्रा कालावधीत दर्शन रांगेतील नियोजनाबाबत आपत्ती व्यवस्थापन अधिकारी  नेमावा.तसेच आवश्यक ठिकाणी सूचना फलक लावावेत. महावितरण विभागाने अखंडीत व सुरक्षित वीज पुरवठा करावा अशा सूचनाही श्री.गुरव यांनी यावेळी दिल्या.
यात्रा कालावधीत येणाऱ्या भाविकांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे यासाठी बोअरवेल, हातपंपाची पाणी तपासणी करण्यात येत आहे. जादा हंगामी स्वच्छता कर्मचाऱ्यांची  नेमणूक करण्यात येणार आहे. 65 एकरमध्ये भाविकांच्या सुविधेसाठी  पाणी, वीज, स्वच्छता आदी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असल्याचे  मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी सांगितले. तसेच मठामध्ये शिल्लक राहिलेले अन्न बाहेर न टाकता घंटा गाडीतच टाकावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 
चैत्री यात्रा कालावधीत पत्राशेड, दर्शन रांग, दर्शन मंडप, मंदीर मंदीर परिसर  येथील स्वचछता मंदीर समितीच्या वतीने करण्यात आहे. यासाठी 400 स्वयंसेवक व मंदीर समितीच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांची नेमणेक करण्यात आली आहे. दर्शनरांगेतील भाविकांना दशमी, एकादशी व द्वादशी दिवशी खिचडी, लिंबू सरबत, ताक किंवा मठ्ठा मोफत वाटप करण्यात येणार आहे. भाविकांसाठी पुरेसा प्रमाणात बुंदी व राजगिरा लाडूप्रसाद व्यवस्था   करण्यात आली असल्याचे मंदीर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगितले.
 चैत्री यात्रा कालावधीत प्रदक्षिणा मार्ग व मंदीर परिसरात फिरते विक्रेते, हाथगाडी वाले यांचा भाविकांना त्रास होऊ नये यासाठी 4 पोलीस अधिकारी 35 पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. तसेच प्रदक्षिणा मार्गावर वाहनांना बंदी असून वाहन धारकांनी पोलीस प्रशासनाने दिलेल्या सूचनाचे पालन करावे. असे आवाहन पोलीस निरिक्षक अरुण फुगे यांनी केले.