श्री एकनाथी भागवत ग्रंथाचा वैभवशाली गजारुढ ग्रंथ दिंडी सोहळा संपन्न

एकनाथ महाराजांच्या जलसमाधीस ४२५ वर्षे पूर्ण होत आहेत

श्री एकनाथी भागवत ग्रंथाचा वैभवशाली गजारुढ ग्रंथ दिंडी सोहळा संपन्न

श्री एकनाथी भागवत ग्रंथाचा वैभवशाली गजारुढ ग्रंथ दिंडी सोहळा संपन्न

पंढरपूर: पंढरीत आज भव्य दिव्य असा श्री एकनाथी भागवत गजारुढ ग्रंथ दिंडी सोहळा संपन्न झाला. वारकरी संप्रदायातील आधाराचा स्तंभ ('खांब') अशी ओळख असणारा 'श्री एकनाथी भागवत ' ग्रंथ. हा श्री संत एकनाथ महाराज लिखीत श्रीमद् भागवत ग्रंथाच्या एकादश स्कंधावरील प्राकृत ग्रंथ . श्रीज्ञानेश्वरी श्रीतुकाराम गाथा व एकनाथी भागवत हे वारकरी संप्रदायात प्रस्थानत्रयी ग्रंथ मानले जातात. यातील एकनाथी भागवत ग्रंथास या वर्षी (शके १९४५) ४५० वर्षे पूर्ण होत आहेत.तर एकनाथ महाराजांच्या जलसमाधीस ४२५ वर्षे पूर्ण होत आहेत. ज्यावेळी हा ग्रंथ स्वतः संत एकनाथ महाराज यांनी श्रीकाशी येथे लिहून पुर्ण केला त्यावेळी तेथील विद्वानांनी प्राकृत भाषेतील या अलौकीक ग्रंथाचा वैभवशाली सन्मान करण्यासाठी काशीक्षेत्रात या ग्रंथाची हत्तीवरुन गौरव मिरवणूक काढली होती. याच गोष्टीची पुनरावृत्ती आज पंढरपूर येथे झाली.वारकरी संप्रदायासाठी काशीक्षेत्राहूनही महान अशा पंढरी क्षेत्रात आज नवरात्र प्रारंभी हा सोहळा संपन्न झाला.

           हजारो वारकऱ्यांची उपस्थिती ज्ञानोबा तुकाराम नामाचा गजर , ४५० टाळांचा गजर ५१ मृदंगांचा निनाद, वारकरी पताका,जरी पटका, तुतारीचा नाद, व गजराजावर विराजमान हस्तलिखित श्रीएकनाथी भागवत ग्रंथ अशा वैभवशाली पद्धतीने हा गजारुढ ग्रंथ दिंडी सोहळा संपन्न झाला. पंढरीत संपन्न झालेल्या या अभुतपुर्व अतिया सोहळ्याला पंढरपूरकर नागरिक, व्यापारी, रिक्षाचालक , लहान व्यावसायिक, गणेश मंडळे यांनी मोठ्या प्रमाणात आपापल्या घरा समोर सडा, रांगोळी, पुष्पवृष्टी करत या सोहळ्याचे भव्य दिव्य स्वागत करत संतविचारांचा मोठा सन्मान केला. लहान मुले,स्त्रिया, वृद्ध माता पिता यांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी करत सोहळ्याचा आनंद घेतला. 

        या कार्यक्रमासाठी आवर्जून श्री संत एकनाथ महाराज यांचे विद्यमान वंशज ह.भ.प

योगिराज महाराज गोसावी, ह.भ.प श्री.योगेश महाराज पालखीवाले, हे खास श्रीक्षेत्र पैठण हुन उपस्थित होते.तसेच नामदेव महाराजांचे वंशज नामदास महाराज, तुकाराम महाराजांचे वंशज,देहूकर महाराज, ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मुख्य मानकरी वासकर महाराज , तसेच गाथा मुर्ती राऊत महाराज, अंमळनेरकर महाराज,बडवे महाराज हरिदास महाराज, उत्पात महाराज,सिद्धरस महाराज, बोधले महाराज,राशिनकर महाराज नंधानकर महाराज, ठाकूर महाराज,चवरे महाराज,इंगळे महाराज, अलिबागकर महाराज, कबीर महाराज, बागडे महाराज, तारे महाराज , पैठणकर महाराज,महेशराव भिवरे हि सर्व मान्यवर फडकरी, दिंडी मालक, संस्थानिक, मंडळी तसेच, श्री विठ्ठल रुक्मिणी आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था, मुमुक्षू पाठशाळा, प्रमोद महाराज ठाकरे संस्था, पवार महाराज संस्था, तसेच चातुर्मास वारकरी साधक या सर्वांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. वारकरी संप्रदाय पाईक संघ खर्या अर्थाने वारकरी संप्रदायाभिमुख सेवा करत असल्याचे गौरवोद्गार उपस्थित मान्यवरांनी काढले.अशा प्रकारे संतसन्मान सोहळे सर्वत्र साजरे व्हायला हवेत अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली. दिंडी सोहळा झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.लोकमान्य मित्र मंडळ, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, यातील तरुण सहकारी मंडळींनी सोहळ्याला परिश्रमाचे महत्वपूर्ण योगदान दिले.व सायंकाळी पाच वाजता श्रीसमर्थ प्रतिष्ठानचे ह.भ.प. डाॅ. भागवत कानडे यांच्याकडे संतपुजन होऊन सोहळ्याची सांगता झाली.