प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सकारात्मक बदल स्वीकारून काम करावे -
प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सकारात्मक बदल स्वीकारून काम करावे -

प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सकारात्मक बदल स्वीकारून काम करावे - पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या इमारतीचे उदघाटन
सोलापूर, दि. 17 (जि. मा. का.) :
लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी ही प्रशासनाची चाके आहेत. त्यांनी परस्पर समन्वय साधला तर प्रभावी काम होईल. जनतेला त्याचा फायदा होईल. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सकारात्मक बदल स्वीकारून काम करावे. पोलीस विभागाने अन्य कार्यालयाप्रमाणे नागरिकांना ऑनलाईन तक्रार दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी. शासन नवीन उपक्रमांना पाठबळ देईल, असे प्रतिपादन महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज केले. मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या उदघाटन कार्यक्रमात ते बोलत होते.
उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या सुसज्ज इमारतीतून चांगले काम व्हावे. त्यातून लोकांच्या अडचणी कमी होतील. त्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी समन्वय साधावा, अशी सूचना करून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, सोलापूर हा विठुरायाच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला जिल्हा आहे. त्यामुळे जिल्ह्याचा गुन्हे दर कमी होण्यास अशा सुसज्ज इमारती मदतीच्या ठरतील, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, अपुरे मनुष्य बळ व सोयी सुविधा या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने 22 हजार पोलीस भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त 75 हजार जागा भरण्यात येणार आहेत. बदलत्या तंत्रज्ञानामुळे समाजात जागृती निर्माण होत आहे. मात्र माहितीच्या नवनवीन साधनामुळे बातमी वेगाने पसरते. बातमीचा विपर्यास होतो. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. अशी परिस्थिती सांभाळण्याची जबाबदारी पोलीस विभागाकडे येते. सायबर गुन्हेगारी हे मोठे आव्हान पोलीस प्रशासनापुढे असून, अधिकाऱ्यांनी अधिक दक्ष राहिले पाहिजे, असे ते म्हणाले.
यावेळी आमदार समाधान आवताडे, आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक (सोलापूर ग्रामीण) शिरीष सरदेशपांडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, अपर पोलीस अधीक्षक (ग्रामीण) हिंमत जाधव, उपविभागीय अधिकारी अप्पासाहेब समिंदर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी, तहसीलदार स्वप्निल रावडे, पोलीस निरीक्षक रणजित माने, गटविकास अधिकारी शिवाजी पाटील, मुख्याधिकारी निशिकांत परचंड राव
आदि उपस्थित होते.
पालकमंत्री यांच्या हस्ते फीत कापून इमारतीचे उदघाटन करण्यात आले. तसेच कोनशीलेचे अनावरण करण्यात आले. उदघाट्नानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व अन्य मान्यवरांनी इमारतीची पाहणी केली. आमदार समाधान आवताडे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक शिरीष सरदेशपांडे यांनी केले. आभार हिंमत जाधव यांनी मानले.
कार्यक्रमास पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.
इमारतीची माहिती
मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय इमारतीसाठी 41 लाख रुपये खर्च करण्यात आला असून, दि. 30 सप्टेंबर 2022 रोजी इमारतीचे काम पूर्ण करण्यात आले. यामध्ये संरक्षक भिंत, मुरमीकरण, रॅम्प, पाण्याची व्यवस्था, विद्युतीकरण, रंगरंगोटी आदि कामे करण्यात आली. यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून निधी प्राप्त झाला आहे.