पंढरपूर विधानसभा मतदार संघात 3 लाख 71 हजार 290 मतदार
सोशल मिडीयाचा वापर उमेदवार व मतदारांनी जपून वापर करावा
पंढरपूर विधानसभा मतदार संघात 3 लाख 71 हजार 290 मतदार
निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे
पंढरपूर निवडणूक आयोगाने राज्यातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. पंढरपूर विधानसभा मतदार संघात 1 लाख 90 हजार 135 पुरुष मतदार तर 1 लाख 80 हजार 577 स्त्री मतदार व इतर मतदार 26 असे एकूण 3 लाख 71 हजार 290 मतदार आहेत. तसेच 552 सैनिक मतदार आहेत. विधानसभा मतदार संघामध्ये एकूण 357 मतदान केंद्रे आहेत. प्रत्येक मतदान केंद्रासाठी 1 याप्रमाणे 357 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी नेमण्यात आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे यांनी दिली.
पंढरपूर विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी क्षेत्रीय अधिकारी 36, भरारी पथक 18, स्थिर पथक 16, व्हिडीओ पहाणी पथक 14, व्हिडीओ सर्वेक्षण पथक 2 तसेच समन्वय अधिकारी म्हणून 40 नोडल अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. क्षेत्रीय अधिकारी यांच्या नेमून दिलेल्या गावामध्ये संयुक्त भेटी झालेल्या असून त्याबाबतचे अहवाल कार्यालयास प्राप्त झाले आहेत. तसेच यापूर्वी सर्व मतदान केंद्रांची सुविधा बाबतची तपासणी पर्यवेक्षक व मंडल अधिकारी यांच्याकडून करून घेण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया निर्भयपणे पार पडावी म्हणून तक्रार निवारण केंद्र, सुविधा अॅप, टपाली मतदान सुविधा, भरारी पथके, स्थिर पथके, व्हिडीओ पहाणी पथके, व्हिडीओ सर्वेक्षण पथक तैनात करण्यात येणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी 85 वर्षावरील मतदार संख्या ही 5334 आहे. तर अपंग मतदार(पी.डब्ल्युडी) 2710 आहे. ज्यांना मतदान केंद्रावर मतदानासाठी येणे शक्य नाही, अशा मतदारांना होम वोटिंग सुविधा देण्यात येणार आहे. त्यासाठी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. पंढरपूर मतदार संघात एकही केंद्र संवेदनशील नाही. तर 50 टक्के मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग करण्यात येणार आहे.
मतदान प्रक्रिया राबविण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय पंढरपूर येथे निवडणूक नियंत्रण व समन्वय कक्ष व कंट्रोल रुम तयार करण्यात आली आहे. याव्दारे सर्व पथकांवर नजर ठेवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आचारसंहितेबाबत काही तक्रारी असल्यास सी व्हिजील अॅप वापरण्यात येत आहे. तर उमेदवारांना लागणाऱ्या सर्व परवानग्या घेण्यासाठी एक खिडकी योजना व सुविधा प्रणालीव्दारे अर्ज करण्याची सुविधा उपल्बध करुन देण्यात आली आहे. नागरिकांनी मतदार नोंदणी, मतदार यादीत नाव तपासणी यासाठी व्होटर हेल्पिंग ॲपचा करु शकता. भारत निवडणूक आयोग यांनी जाहीर केल्याप्रमाणे पंढरपूर विधानसभा मतदार संघासाठी आदर्श आचार संहिता दि. 15 ऑक्टो. रोजी पूर्वलक्षी प्रभावाने लागू झालेली आहे. दि. 22 ऑक्टो. रोजी निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार अहे. नामनिर्देशन 23 ते 29 ऑक्टो. पर्यंत, अर्जाची छानणी 30 ऑक्टो.पर्यंत, उमेदवारी अर्ज माघार घेण्याची अंतिम तारीख 4 नोव्हेंबर,दि.20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे. मतमोजणी दि. 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे. तर निवडणूक प्रक्रिया दि. 25 नोव्हेंबर पर्यंत पुर्ण करण्यात येणार आहे. आदर्श आचार संहिता जाहीर झाल्यापासून पंढरपूर विधानसभा मतदार संघातील सर्व राजकीय पक्षांचे भित्तीपत्रके, घोषवाक्ये, पोस्टर्स, बॅनर्स, झेंडे तातडीने यंत्रणे मार्फत हटविण्याचे काम चालू आहे. दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रावर येण्यासाठी व्हिलचेअर, रॅम्पची सुविधा, उमेदवारांसाठी अर्ज भरणे सोपे जावे म्हणून सुविधा अॅपची मदत घेता येणार आहे. 50 टक्के मतदान केंद्रांवर सीसीटिव्ही सुविधा उपल्बध करण्यात आली आहे. उमेदवारांचा निवडणूक खर्च तीन वेळा तपासला जाणार आहे. सोशल मिडीयाचा वापर उमेदवार व मतदारांनी जपून वापर करावा असे आवाहनही निवडणूक निर्णय अधिकारी इथापे यांनी यावेळी केले.