मंदिर समितीच्यावतीने स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा
मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांची सजावट
मंदिर समितीच्यावतीने स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा
गहिनीनाथ महाराज औसेकर
पंढरपूर (ता.15) भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त मंदिर समितीच्या वतीने गुरुवार दिनांक 15 ऑगस्ट, 2024 रोजी सकाळी 8.15 वाजता राष्ट्रीय ध्वजारोहणाचा समारंभ श्री विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास पंढरपूर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. यावेळी मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे व ह.भ.प.श्री. ज्ञानेश्वर देशमुख (जळगावकर) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री, मंदीर समितीचे सर्व विभाग प्रमुख तसेच कर्मचारी उपस्थित होते. सदरचा कार्यक्रम पार पाडण्यासाठी विभाग प्रमुख विनोद पाटील, राजेंद्र सुभेदार, चंद्रकांत कोळी, बलभीम पावले, सहाय्यक विभाग प्रमुख सावता हजारे, दादा नलवडे, भाऊसाहेब घोरपडे यांनी परिश्रम घेतले.
मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांची सजावट
सलग सुट्ट्यामुळे भाविकांची दर्शन रांगेत गर्दी, मंदिर प्रशासनामार्फत आवश्यक त्या सुविधा उपलब्ध
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास व भक्तनिवास इमारतीस तिरंग्याची आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. तसेच मंदिरात देखील आकर्षक फुलांनी सजवले आहे. मंदिरातील प्रवेशद्वार, चारखांबी, सोळखांबी, मंदिरा बाहेर अशा ठिकाणी तीन रंगांच्या फुलांची आरास करण्यात आली आहे. सदरची फुलांची आरास श्रीमंत दगडूशेठ मोरया प्रतिष्ठान पुणे यांनी सेवाभावी तत्त्वावर मोफत करून दिली आहे. त्यासाठी त्यांनी केशरी झेंडू, स्पिंगर, शेवंती इत्यादी एक टन फुलाचा वापर करून आरास केली आहे. त्याचबरोबर श्री. संत तुकाराम भवन येथील अन्नछत्रांमध्ये विशेष भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचा सुमारे दोन हजार भाविकांनी लाभ घेतला. त्यासाठी श्री विठ्ठल गण सभा ट्रस्ट, तिरुअनंतपुरम यांनी सुमारे एक लाख 25 हजार किमतीचे अन्नधान्य मोफत उपलब्ध करून दिले आहे. तसेच परंपरेनुसार दुपारी पोशाखा वेळी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेस अलंकार परिधान करण्यात आले.
दि.15 ऑगस्ट 2024 रोजी भारतीय स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन व 16 ऑगसट रोजीची पुत्रदा एकादशी व त्यानंतर सलग शासकीय सुट्ट्या आल्याने व श्रावण मास असल्याने श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनरांगेत मोठ्या प्रमाणात भाविकांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन, भाविकांना पुरेशा प्रमाणात सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर व कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने दर्शन रांगेतील भाविकांचे सुलभ व जलद दर्शन होण्याच्या दृष्टीने सुरक्षा रक्षकांची नेमणूक, व्हीआयपी दर्शन व्यवस्था निर्बंध, भाविकांच्या हस्ते होणाऱ्या पूजाची संख्याही कमी करण्यात आली आहे. तसेच चांगली स्वच्छता व्यवस्था, मजबूत बॅरेकेटिंग, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, साबुदाणा - तांदळाची खिचडी, चहा वाटप इत्यादी व्यवस्था दर्शन रांगेत करण्यात आल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.