राष्ट्रीय लोकअदालतीत 250 प्रकरणे निकाली

तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. बी. लंबे

राष्ट्रीय लोकअदालतीत 250 प्रकरणे निकाली

राष्ट्रीय लोकअदालतीत 250 प्रकरणे निकाली

लोकअदालतीत 4 कोटी 12 लाख 29 हजार रुपयांची तडजोड 

 तब्बल 20 वर्षापुर्वीचा जमीन वादाचे अपील निकाल      

  पंढरपूर दि.13:- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार पंढरपूर तालुका विधी सेवा समितीच्या वतीने शनिवार दि. 11 फेब्रुवारी 2023 रोजी जिल्हा न्यायालय, पंढरपूर येथे लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीमध्ये 250 प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली. या प्रकरणांमध्ये 4 कोटी 12 लाख 29 हजार 869 रुपयांची तडजोड करण्यात आली. तसेच सुमारे 20 वर्ष 6 महिन्यांपासुन प्रलंबित असणारे दिवाणी अपील तडजोडीअंती निकाली निघाले असल्याची माहिती तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. बी. लंबे यांनी दिली. 

       जिल्हा व सत्र न्यायालय, पंढरपूर येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन तदर्थ जिल्हा न्यायाधीश बी. बी. तोष्णीवाल यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. पॅनल क्रमांक 1 मध्ये सन 2002 मध्ये दाखल असलेले जमीनीच्या वादाचे अपील हे तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते. मौजे कासेगाव (ता.पंढरपूर) येथील जमीनीच्या वादाचे अपील होते. अपीलार्थी व उत्तरार्थी यांनी सदरचे अपील निकाली करणेसाठी तडजोडसाठी दाखल करुन आपआपले क्षेत्राची कायदेशिर फाळणी व मोजणी करुन घेण्यास संमती दर्शविल्याने सदरचे अपील तंडजोडीअंती निकाली निघाले आहे.

       लोकअदालतीसाठी एकुण 5 पॅनलची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये तदर्थ जिल्हा न्यायाधीश- बी. बी. तोष्णीवाल, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर ए. ए. खंडाळे, दिवाणी न्यायाधीश एम. आर. कामत, दिवाणी न्यायाधीश श्रीमती टी. जी. बन्सोड तसेच दाखलपूर्व प्रकरणांच्या पॅनलमध्ये दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर. एम. आर. जाधव यांनी काम पाहिले.

       तत्पुर्वी राष्ट्रीय लोकअदातीचे उद्घाटन करुन नागरिकांमध्ये लोकअदालतीमध्ये लोकअदालतीचे असणारे महत्वाची माहिती देण्यात आली. सदर प्रसंगी पंढरपूर अधिवक्ता संघाचे अध्यक्ष श्री. भगवान मुळे व श्री. एम. एम. नाईकनवरे उपाध्यक्ष हे उपस्थित होते.

        सदर लोकअदालतीस विधीज्ञ, बॅंक कर्मचारी, न्यायालयीन कर्मचारी, महावितरणचे अधिकारी व पक्षकार मोठया संख्येने उपस्थित होते.