लोकप्रतिनिधी, स्थानिक नागरिक, व्यापारी, वारकऱ्यांना विश्वासात घेऊन तीर्थक्षेत्र विकासाची कामे करणार

लोकप्रतिनिधी, स्थानिक नागरिक, व्यापारी, वारकऱ्यांना विश्वासात घेऊन तीर्थक्षेत्र विकासाची कामे करणार

लोकप्रतिनिधी, स्थानिक नागरिक, व्यापारी, वारकऱ्यांना  विश्वासात घेऊन तीर्थक्षेत्र विकासाची कामे करणार

लोकप्रतिनिधी, स्थानिक नागरिक, व्यापारी, वारकऱ्यांना

विश्वासात घेऊन तीर्थक्षेत्र विकासाची कामे करणार

                           अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची माहिती 

पंढरपूर, दि.10(उमाका):- श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरला दररोज मोठ्या प्रमाणात भाविक येतात. पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना व स्थानिक नागरिकांना पायाभूत सुविधा मिळाव्यात यादृष्टीने प्रस्तावित तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत नव्याने कामे समाविष्ट करण्यात आली आहेत. या विकास कामात ऐतिहासिक व पुरातन वास्तूचे जतन करुन कामे करण्यात येणार आहेत. तसेच विकासाची कामे करताना लोकप्रतिनिधी, स्थानिक नागरिक, व्यापारी, वारकऱ्यांना विश्वासात घेवूनच कामे करण्यात येणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी सांगितले.

श्री क्षेत्र देहू, आळंदी, भंडारा डोंगर, पंढरपूर व पालखीतळ, पालखी मार्ग विकास आराखड्यातंर्गत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर ,मंदिर परिसर पंढरपूर शहर व पालखी मार्गावर वारकरी भाविकांना मूलभूत सुविधा पुरविण्याच्या अनुषंगाने प्रारूप तीर्थक्षेत्र विकास आराखडा निश्चितीबाबत लोकप्रतिनिधी, स्थानिक नागरिक व व्यापारी, वारकरी संघटना यांच्याशी चर्चा करण्यासाठी संत तुकाराम भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी तथा अप्पर जिल्हा अधिकारी संजीव जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक हिंमतराव जाधव, विठ्ठल-रुक्मिणी मंदीर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड, प्रांताधिकारी गजानन गुरव, मंदीर समितीचे सदस्य, लोकप्रतिनिधी, स्थानिक नागरिक-व्यापारी , वारकरी प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्रीमती सौनिक म्हणाल्या, मंदिरात येणाऱ्या वारकरी भाविकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, श्रींचे दर्शन सुखकर व्हावे यासाठी मंदिरातील मूळ वास्तूचे व वारकरी सांप्रदायाच्या प्रथा परंपरेचे जतन करून पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनानुसार मंदिर व मंदिर परिसराचा विकास करण्यात येणार आहे. यासाठी मंदीर समिती सदस्य, वारकरी, महाराज यांना विश्वासात घेवून मंदिराचा विकास करण्यात येणार आहे. तसेच नदी स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, पार्किग, पाणी आदी पायाभूत सुविधेचे कामे प्राधान्याने करण्यात येणार आहेत. तीर्थक्षेत्र विकास आरखड्याबाबत नागरिकांनी तसेच व्यापाऱ्यांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये असेही त्यांनी यावेळी सांगितले.

श्री. राव म्हणाले, तीर्थक्षेत्र विकास आराखडयांतर्गत करण्यात येणारी कामे ही स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आणून व विश्वासात घेवूनच करण्यात येणार आहेत. पंढरपूरच्या परंपरेला व संस्कृतीला धक्का न पोहचता विकास कामे करण्यात येणार आहेत. तीर्थक्षेत्र विकासाचा प्रारुप आराखडा करताना पुढील 25 वर्षानंतर होणारी गर्दी व वाहतूक व्यवस्था विचारात घेवून करण्यात आला आहे. हा आराखडा सर्व नागरिकांना पाहण्यासाठी ठेवण्यात येणार असून. या आरखड्याबाबत अजूनही काही सूचना असल्यास त्या चार दिवसांत प्रशासनास कळवाव्यात. स्थानिक नागरिक, व्यापाऱ्यांनी विकास कामांबाबत प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 यावेळी जिल्हाधिकारी शंभरकर यांनी तीर्थक्षेत्र विकास आखड्यातर्गत वारकरी ,भाविक, स्थानिक नागरिक यांना देण्यात येणाऱ्या सुविधा, पालखीतळ, पालखी मार्ग, शहरातील विकास कामे यासह नवीन समाविष्ट कामांची माहिती दिली.

यावेळी तीर्थक्षेत्र विकास आरखड्याबाबत स्थानिक नागरिक, व्यापारी, वारकरी यांनी आपल्या काही सूचना मांडल्या.